I can do everything “सर्वज्ञतेचा अतिरेक: ‘मी सर्व काही करू शकतो‘ हे धोरण सोडायलाच हवे!”
आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि अहंकाराने भरलेल्या जगात एक विचार बळावत चालला आहे – “मी सर्व काही करू शकतो! (I can do everything)” हा विचार ऐकायला जरी प्रेरणादायी वाटत असला, तरी यामागचा अतिरेक अनेकांना अंधाराच्या खाईकडे नेत आहे. ही केवळ प्रेरणेची नव्हे, तर अनेक वेळा आत्मघातकी अडसुळ बनत चाललेली वृत्ती आहे. या विचारातून तयार होणारा माणूस स्वतःला सर्वगुणसंपन्न समजतो. तो सल्ला घेत नाही, मदत मागत नाही, चुकांमधून शिकत नाही. कारण त्याला वाटतं, “माझं म्हणणंच अंतिम आहे.” पण खरंच असं असतं का?

I can do everything
सर्वज्ञ होण्याची भ्रमभावना प्रत्येक माणसात वेगळं कौशल्य असतं. कुणी उत्तम नेतृत्व करू शकतो, कुणी बारकाईने निरीक्षण करतो, कुणी विश्लेषणात पटाईत असतो, तर कुणी संकल्पनांची उभारणी करू शकतो. परंतु सर्वच काही मी करू शकतो हा विचार या सर्जनशीलतेवर विराम आणतो. अशा वृत्तीत माणूस दुसऱ्यांना कमी लेखतो. ही वृत्ती व्यक्तिगत संबंध, संघटनात्मक कार्यक्षमता आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करते.
पराभवाचं कारण
अती आत्मविश्वास इतिहास साक्ष आहे की अनेक मोठे प्रकल्प, उद्योग, संस्था किंवा व्यक्तिमत्त्वे केवळ याच एका कारणाने कोसळली – मी चुकीचा असूच शकत नाही! हा गर्व.
एखाद्या छोट्या व्यवसायापासून ते राजकीय व्यवस्थेपर्यंत, जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की ‘माझ्याशिवाय हे शक्यच नाही’, तेव्हा ती त्या योजनेच्या अध:पतनाची सुरुवात असते.
मदतीची गरज ही कमजोरी नाही आजही अनेकांना असं वाटतं की मदत मागणं म्हणजे कमकुवतपणा. म्हणूनच “मी एकट्यानेच सर्व काही करू शकतो” या अहंकारातून ते स्वतःच्या कुवतीपलीकडे जबाबदाऱ्या घेतात. परिणामी नैराश्य, असमाधान, अपयश आणि थकवा या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घुसतात.
मदतीची गरज हे मानवीपणाचं लक्षण आहे, दुर्बलतेचं नव्हे. संघशक्तीची ताकद सहकार्य, सहजीवन आणि सामूहिक यश हीच खरी मानवी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
एखादा चित्रपट घ्या – दिग्दर्शक, लेखक, छायाचित्रकार, संकलक, कलाकार, संगीतकार – या सर्वांच्या एकत्र कामामुळे तो चित्रपट घडतो. जर दिग्दर्शकानेच ठरवलं की तो स्वतः सर्व भूमिका करेल, संवाद लिहील, संगीत देईल आणि चित्रणही करेल, तर परिणाम काय होईल? स्पष्ट आहे – गुणवत्तेचा बळी जाईल.
आत्मपरीक्षण आणि मर्यादा जाणणे “माझं ज्ञान मर्यादित आहे,” ही भावना स्वीकारणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती प्रगल्भतेची आणि समजूतदारपणाची पायरी आहे. प्रत्येक क्षेत्राची, कौशल्याची एक मर्यादा आहे. हे लक्षात घेतल्याशिवाय विकास शक्यच नाही.
गांधीजींनी एकदा म्हटले होते – “I have learnt much from my critics than from my followers.” याचा अर्थच असा की दुसऱ्यांना समजून घेतल्याशिवाय किंवा इतरांकडून शिकल्याशिवाय आपण स्वतःही सुधारू शकत नाही. सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरील परिणाम “मी सर्व काही करू शकतो” हा दृष्टिकोन केवळ व्यक्तिगत पातळीवरच नाही, तर कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरही दुष्परिणाम घडवतो. एखादा पिता, जो घरातील सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर घेतो – निर्णय, खर्च, शिकवणी, करिअर मार्गदर्शन – त्याने जर पत्नीला, मुलांना किंवा अन्य सदस्यांना कधी संधीच दिली नाही, तर अशा घरात तणावच वाढतो. विकसनशील समाजासाठी सहभाग आवश्यक असतो, अधिनायकत्व नव्हे.
योग्यतेला वाव द्या जेव्हा आपण “मी सर्व काही करू शकतो” या विचारातून बाहेर पडतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने योग्यतेला, नवसंकल्पनांना आणि सर्जनशीलतेला वाव मिळतो. नेतृत्व म्हणजेच सगळं स्वतः करणं नव्हे, तर योग्य लोकांच्या हातात योग्य काम सोपवून त्यांच्यावर विश्वास ठेवणं असतं.
निष्कर्ष
‘मी सर्व काही करू शकतो’ हे धोरण खूप आकर्षक वाटतं. ते तुम्हाला क्षणिक यश देऊ शकतं, पण दीर्घकालीन प्रभावाच्या बाबतीत ते अपयशी ठरतं. कारण या दृष्टिकोनात ‘मी’ आहे, पण ‘आपण’ नाही. समाज, कुटुंब, संस्था आणि स्वतःच्या मनाचा खरा विकास ‘आपणपणात’ आहे, ‘स्वतःपुरतं’ राहण्यात नव्हे. म्हणून आजच्या या अहंकाराच्या युगात, प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारावा –
“मी सर्व काही करू शकतो, पण का कराव?” (I can do all things)
लेखन – मनिष जोशी ₹udra – शब्दांचा शिलेदार
हे देखील वाचा – अग्रलेख
